नववी शिकलेल्या दलित समाजाच्या ज्या कल्पना सरोजने मुंबईत २ रुपये रोजगारावर दिवस काढले, त्याच कल्पना सरोजने १६५ कोटी कर्ज असलेली ५५० कामगार देशोधडीला लागलेली कमानी ट्यूब्स लिमिटेड हि कंपनी ताब्यात घेवून यशस्वीपणे चालवून दाखवली. आज १०० कोटींची उलाढाल करणारी हि कंपनी येत्या काळात ३ हजार कोटींची उलाढाल करेल असा त्यांना दृढ विश्वास आहे.
वडील पोलीस खात्यात होते तर आई अशिक्षित होती. त्यांनी तिचे लग्न वयाच्या १२ व्या वर्षीच लावून दिले. ते लग्न म्हणजे त्या कोवळ्या मुलीसाठी नरक यातनाच ठरल्या. त्यामुळे तिला लवकरच माहेरी परतावं लागलं. समाजाने दिलेल्या वागणुकीने त्यांचा जीवनावरचा विश्वासच उडाला. आणि त्यांनी आत्महत्येचा असफल प्रयत्न केला. तेव्हाच त्यांना आयुष्याचा खरा अर्थ कळला. मोठ्या उमेदीने त्या पुन्हा उभ्या राहिल्या. वयाच्या २२ व्या वर्षी त्या मुंबईला आल्या. आईने शिकवलेल्या शिवणकामामुळे त्यांना २ रुपये रोजगारावर मुंबईत काम मिळाले. तिच्या कामाचे कौतुक झाल्या मुळे लवकरच तिला दरमहा ४०० रुपये पगार मिळाला. आयुष्यातील तो फार आनंदाचा क्षण होता. फर्निचरचा व्यवसाय असलेल्या एका तरुणाशी त्यांनी लग्न केले. पण दुर्दैवाने तिची पाठ काही सोडली नाही आणि त्यांच्या पतीचे अकाली निधन झाले. जेमतेम शिक्षण झालेल्या कल्पना सरोजला दोन मुलांच्या भविष्यासाठी तरी पाया वर उभे राहणे भाग होते.
पतीचा व्यवसाय जिद्दीने सांभाळत त्यांनी स्टील कपाटे बनविण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतले. बघता बघता गाठीला चार पैसे जमले तेव्हा त्यांनी रिअल इस्टेट क्षेत्रात प्रवेश केला. १९९५ मद्धे त्यांनी अवघ्या अडीच लाखाला एक भूखंड खरेदी केला, जो त्यांनी काही वर्षापूर्वी तब्बल ४० कोटीला विकला आणि त्यानंतर त्यांचे नशीबच बदलून गेले. डबघाईला आलेला एक साखर कारखाना त्यांनी खरेदी केला. बघता बघता एकाचे दोन कारखाने झाले. अशावेळी कमानीचे काही कामगार त्यांना भेटले आणि त्यांनी त्यांना आपली कंपनी खरेदी करायची विनंती केली. कंपनीवर प्रचंड कर्ज होतं. कामगारांची देणी आणि दीडशे खटले होते. तरी त्यांनी मोठ्या जिद्दीने ती कंपनी विकत घेतली. कामगारांची देणी चुकती करून नफ्यातही आणून दाखवली. तेव्हा रतन टाटा पासून सर्वच उद्योगपतींनी त्यांना शाबासकी दिली. ५०० कोटीचे साम्राज्य उभे करणाऱ्या कल्पना सरोज यांचा एक मुलगा पायलट आहे. तर मुलगी लंडन मध्ये हॉटेल म्यानेजमेंट शिकत आहे. लवकरच त्या हेलीकोप्तरही घेणार आहेत. अशा या महान महिलेच्या कर्तुत्वाला आमचा त्रिवार सलाम.