Sunday, October 21, 2012

रामदासाचा मूर्ख


साभार : http://drabhiram.blogspot.in/

सांगे वडिलांची कीर्ती| तो येक मूर्ख ।। असे एक समर्थवचन आहे. बटाट्याचा कीस खाउन उपास करणार्यां धार्मिकांना ; रामदास स्वामिंच्या वेळी महाराष्ट्रात बटाटा न्हवताच; तो युरोपियनांनी मागाहून आणला हे जसे माहित नसते तसेच - ह्या समर्थवचनाचा अर्थ (संस्कृती रक्षक) धर्मप्रेमी कसा लावतात? हे मला देखील माहित नाही. मी मात्र माझ्या परीने ह्या ओळीचा विस्तार करण्याचा प्रयत्न करतो. पूर्वजांची कीर्ती सांगणारा माणूस मूर्ख म्हटला पाहिजे असा त्याचा अर्थ. पुरा श्लोक असा आहे -


आपली आपण करी स्तुती| स्वदेशीं भोगी विपत्ति |
सांगे वडिलांची कीर्ती| तो येक मूर्ख ||१२||


" क्ष " नावाचं येडं स्वतः संकटात आहे तरी स्वतःच स्वतःची स्तुती करतो आहे. वडलांची कीर्ती सांगतो आहे तो क्ष मूर्ख म्ह्टला पाहिजे. मूर्खलक्षणात हे येते. हे मूर्खलक्षण त्रिकालाबाधित असल्याने क्ष च्या बापाला, त्याच्या आज्याला आणि पणज्यालाही लागू होते. म्हणजे पूर्वजांची कीर्ती सांगत बसू नये - स्वतःच्या हाताने काहितरी करून दाखवावे असा ह्या श्लोकाचा अर्थ घेता यील. रामदास प्रयत्नवादी असल्याने त्यांनी स्वतःच्या हाताने काहितरी करण्यावर भर द्यावा हे ठीकच. पण बापजाद्यांचा उदोउदो करत सुद्धा प्रयत्नवादी रहाता यीलच की ! खरी गोम इथेच आहे.

किंबहूना बापजाद्यांचा उदोउदो करण्यासाठीच प्रयत्न केले पाहिजेत असेही बहुत समर्थभक्त वदतील. पण असे केल्याने संकटाचा नायनाट, विपत्तीचे हरण होत नाही हा मुद्दा आहे. मानवांचे पूर्वज माकड होते हे शास्त्रीय सत्य आहे. त्यानंतर आपल्या रानटी पूर्वजांची निर्मिती झाली. आजच्या मानवजातीचे पूर्वज रानटी होते. हा मुद्दा आहे.





गेल्या दहा हजार वर्षांचा इतिहास पाहिला तर मनुष्याची झालेली प्रगतीच दिसून येते. हाच नियम गेल्या दहा शंभर आणी हजार वर्षालाही लागू पडतो. मनुष्य आपल्या ज्ञानाचा संग्रह करतो आणि तो पुढच्या पिढीला देतो. हे ज्ञान पाठांतरित, मुद्रित किंवा किंवा कशाही स्वरूपात पुढच्या पिढीला देता येते. त्यामुळे आज्यापेक्षा नातवाकडे जास्त ज्ञान असते. नातू जेंव्हा आजा होतो तेंव्हा त्यालाही हा नियम लागू होतो.
हा नियम खुद्द समर्थ रामदास स्वामींनाही लागू होतो. त्यांना वंशपरंपरेने जे ज्ञान मिळाले होते त्यात त्यानी दासबोध रचून भरच टाकली असे म्हणावे लागते. आणी त्यानंतरच्या पिढ्यांनी समर्थांचाच कित्ता गिरवत त्यात अधिकाधिक भर टाकली हे ओघानेच येते. बटाट्याच्या किसाचा उल्लेख म्हणुनच केला. बटाटा हे अन्न युरोपियनांनी भारतात आणले. त्या आधी ते भारतात न्हवते त्यामुळे ते उपवासासाठी धर्म्य असण्याचा प्रश्नच न्हवता. धर्म आणी संस्क्रुती काळबरोबर बदलत जातात. आणी समर्थशिष्य कल्याण आणि उद्धवाच्या नशिबात नसलेली चमचमीत साबुदाण्याची खिचडी मला खायला मिळते. साबुदाणा ही पोर्तुगीजांनी आणलेली गोष्ट आहे हे ही लक्षात ठेवावे लागेल.

http://en.wikipedia.org/wiki/Tapioca



हल्लीची पिढी एकदम चुकार म्हणत बोटे मोडणे सोपे आहे - पण पूर्वीच्या पिढीतहि असेच म्ह्टले जायचे हे एकदम सत्य आहे . खरी गोष्ट अशी आहे की - बापाचे ऐकायचे असे आपण ठरवले असते तर आपण आजही गुहेत राहत असतो. जी गोष्ट विज्ञान आणी तंत्रज्ञानाबाबत खरी आहे. तीच गोष्ट नीती आणि सदाचाराबाबतही खरी आहे. हिंदुधर्म जर परिपूर्ण असता - तर दासबोध लिहिण्याची गरज काय होती ? जुन्याच एखाद्या ग्रंथाच्या प्रती समर्थानी काढल्या असत्या तर चालले असते की. कष्ट करोनी घसरावे म्लेंच्छावरी असे आधी कुणी म्हटले न्हवते. रामदासाने ते म्हटले. त्यात आपण पूर्वजांचा अपमान करत आहोत असे त्यांना वाटले नाही. नवनिर्मीती हा निसर्गनियम आहे. रामदासांचे  मला पटत नाही. माझे जातिव्यवस्थेबद्दलचे विचार वेगळे आहेत असे म्हणणे हा रामदासाचा अपमान नाही. कलियुग होउन गेले आहे आणि सत्ययुग आता आणायचे आहे .





समता, न्याय, बंघुभाव, व्यक्तिस्वातंत्र्य याची आताशा कुठे व्यापक प्रमाणावर चर्चा चालू झाली आहे. ह्याची फळे पुढ्च्या पिढ्यांना मिळणार आहेत. लहान मुल जन्मते, रांगते, उभे राहते, चालते, धावते त्याची प्रगती होते हा निसर्गनीयम आहे. त्याचप्रमाणे पुढच्या पिढीकडे आपण ज्ञान संक्रमित करत जातो आणी पुढ्च्या पिढ्यांची प्रगती होते हाही निसर्गनियम आहे. ह्या नियमातून रामदासाची सुटका नाही. परशुरामाची सुटका नाही;मुह्हम्मद, तुकाराम, बुद्ध आणी आंबेडकरांचीही सुटका नाही.


हे जेव्हढ्या लवकर कळेल तितके उत्तम !

आपणासी जे ठावे | ते इतरांसी सांगावे |
शहाणे करूण सोङावे अवघेजण - रामदास


  - डॉ. अभिराम दीक्षित, पुणे

No comments:

Post a Comment