Friday, December 30, 2011

सावित्रीबाई फुले : विद्रोही सुधारक, आधुनिक कवयित्री

साभार लोकसत्ता 
------------------------------------------------------------------------------------------------------------

जास्वंदी वांबुरकर उटगीकर, पदव्युत्तर इतिहास विभाग,
एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ
आधुनिक भारतातील एक जहाल सुधारक व आद्य शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांचे (१८३१-१८९७) कार्य खूप मोलाचे आहे. मात्र जोतीराव फुले यांच्यासारख्या महापुरुषाची पत्नी असल्यामुळे सावित्रीबाईंच्या कार्याची स्वतंत्रपणे फारशी दखल घेतली गेली नाही. तीन जानेवारी २०१० ही सावित्रीबाईंची १७९ वी जयंती आहे. या निमित्ताने त्यांचे समाजकार्य व साहित्य यावर प्रकाश टाकणारा हा लेख..
महाराष्ट्राच्या किंबहुना भारताच्या प्रबोधनाचे शतक हे १९ वे शतक होते. १८१८ मध्ये महाराष्ट्रात पेशवाई संपुष्टात आली व ब्रिटिश अंमल सुरू झाला. एका परकीय सत्तेच्या अमलाखाली महाराष्ट्रात आधुनिकता साकारू लागली. जातीअंताची चळवळ, अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ व स्त्री-सुधारणा चळवळ या महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात सुरू झालेल्या प्रमुख चळवळी होत्या. या तिन्ही चळवळींच्या संदर्भात जोतीराव फुले (१८२७-१८९०) व सावित्रीबाईंचे योगदान आजही पथदर्शक असे आहे.
तीन जानेवारी १८३१ रोजी पुण्यापासून जवळ असलेल्या नायगाव येथे सावित्रीबाईंचा जन्म झाला. १८४० साली म्हणजे वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा जोतीरावांशी विवाह झाला. जोतीरावांनी घरी शिक्षण देऊन त्यांना शिक्षिका बनविले. तसेच अहमदनगर व पुणे येथेही त्यांनी अध्यापनाचे शिक्षण अनुक्रमे फरारबाई व मिचेलबाई यांच्याकडे घेतले होते.
१८४८ साली म्हणजे वयाच्या २१ व्या वर्षी जोतीरावांनी पुण्यात भिडेवाडय़ात मुलींची पहिली शाळा सुरू केली. या शाळेत सावित्रीबाईंनी शिक्षिका म्हणून काम सुरू केले. त्या वेळी त्यांचे वय अवघे १७ वर्षांचे होते. त्यानंतर १८९७ सालापर्यंत म्हणजे जवळपास ५० वर्षे त्यांनी स्वत:ला समाजसेवेत झोकून दिले. फुले दाम्पत्याने पुण्यामध्ये १८५१ साली दोन व १८५२ साली एक अशा मुलींच्या तीन शाळा काढल्या. ‘‘हे कार्य म्हणजे हिंदू संस्कृतीच्या इतिहासातील एका नव्या युगाचा आरंभ होय’’, अशा शब्दांत तत्कालीन ‘दी पुना ऑब्झव्‍‌र्हर अ‍ॅण्ड डेक्कन वीकली’, या वृत्तपत्राने त्यांच्या कार्यारंभाचा गौरव केला. नेटिव्ह फिमेल स्कूल्स व दी सोसायटी फॉर प्रमोटिंग दी एज्युकेशन ऑफ महार्स, मांग्ज अ‍ॅण्ड एक्सेट्राज’ या दोन शिक्षण संस्थांमार्फत पुण्याजवळ त्यांनी अनेक शाळा सुरू केल्या. त्यांच्या शाळेतील मुलींची प्रगती सर्वाना स्तिमित करणारी होती.
एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी स्त्रियांची स्थिती दयनीय होती. बालिका हत्या, बालविवाह, जरठकुमारी विवाह, हुंडापद्धती, सती, केशवपन, विधवा विवाह बंदी अशा दुष्ट प्रथांच्या त्या बळी ठरल्या होत्या. स्त्रीविषयक सुधारणा चळवळीने या प्रश्नांना हात घातला. मात्र स्त्रियांच्या संदर्भातील या विविध समस्या सोडविण्यापुरते फुले दाम्पत्याचे प्रयत्न मर्यादित नव्हते. स्त्रियांना दुय्यम लेखणारी पुरुषी मनोवृत्ती व पुरुषप्रधान व्यवस्था बदलण्याचा त्यांचा प्रयत्न होता. स्त्रीचे कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय व लैंगिक पातळीवरचे स्वातंत्र्य त्यांना अभिप्रेत होते. ‘ज्ञानोदय’मध्ये निबंध (१८५५) लिहिणारी मुक्ता व ‘स्त्री-पुरुष तुलना’ (१८८२) सारखा प्राक- स्त्रीवादी (स्र्१ी-ऋी्रेल्ल्र२३) ग्रंथ लिहिणाऱ्या ताराबाई शिंदे या स्त्रिया म्हणजे फुले दाम्पत्याच्या चळवळीचे साक्षात फलित होते.
पारंपरिक समाजविचाराने उच्चवर्णीय स्त्रीला विधवा विवाह नाकारला व दुसरीकडे योनी शुचितेवर भर दिला. हा पुरुषी दुटप्पीपणा फुलेंनी नाकारला. त्यांनी केवळ तात्त्विक पातळीवर स्त्रीच्या लैंगिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला नाही तर १८६३ साली बालहत्या प्रतिबंधकगृह काढून आपल्या विचाराला कृतीची जोड दिली. फुले दाम्पत्याने आपल्या बालहत्या प्रतिबंधगृहातील एका बाईचा मुलगा दत्तक घेतला. त्याला वैद्यकीय शिक्षण देऊन डॉक्टर केले. हाच डॉ. यशवंत फुले!
ब्राह्मण विधवांच्या केशवपनाविरुद्ध नाभिकांना जागृत करून त्यांचा संप घडवून आणण्याची प्रेरणा सावित्रीबाईंनीच दिली. या संपाबद्दल इंग्लंडमधील स्त्रियांनी त्यांना अभिनंदनाचे पत्र पाठविले.
महात्मा फुलेंनी स्थापलेल्या सत्यशोधक समाजाच्या सावित्रीबाई सक्रिय कार्यकर्त्यां होत्या. या समाजातर्फे कमी खर्चातले, पुरोहिताशिवाय व हुंडय़ाशिवाय विवाह लावून दिले जात. जोतीरावांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक चळवळीची धुरा सावित्रीबाईंनी आपल्या खांद्यावर घेतली. सन १८९३ मध्ये सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. जोतीरावांच्या अग्निसंस्काराच्या वेळी त्यांचा दत्तक मुलगा यशवंत याने अग्नी देण्याबाबत जोतीरावांच्या नातेवाईकांनी आक्षेप घेतला. त्या वेळी सावित्रीबाईंनी स्वत: अग्नी दिला. पत्नीने पतीच्या चितेला अग्नी दिल्याची ही घटना भारताच्या इतिहासात बहुधा पहिल्यांदाच घडली असावी. सन १८९७ मध्ये पुण्यात प्लेगची साथ आली तेव्हा मृत्युला न घाबरता त्यांनी रुग्णांची सेवा केली व त्यातच त्यांना मृत्यू आला.
एक कवयित्री म्हणून सावित्रीबाईंचे कार्य फारच दुर्लक्षित राहिले आहे. सन १९८८ मध्ये ज्येष्ठ अभ्यासक डॉ. मा. गो. माळी यांनी ‘सावित्रीबाई फुले- समग्र वाङ्मय’ प्रकाशित केले. ज्या मराठी समीक्षकांनी सावित्रीबाईंच्या साहित्याला अनुल्लेखाने मारल. विसाव्या शतकात फुले दाम्पत्याच्या साहित्याची उपेक्षा करणारे वाङ्मय समीक्षक हाच चिपळूणकरी वारसा सांगणारे व पवित्रा घेणारे होते.

No comments:

Post a Comment